महालक्ष्मी सरस प्रदर्शनात ७ दिवसांत ९ कोटींची उलाढाल ,५ एप्रिलपर्यंत सुरू राहणार प्रदर्शन

 0
महालक्ष्मी सरस प्रदर्शनात ७ दिवसांत ९ कोटींची उलाढाल ,५ एप्रिलपर्यंत सुरू राहणार प्रदर्शन

मुंबई, दि. १ : वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये सुरू असलेल्या ‘महालक्ष्मी सरस-२०२६’ प्रदर्शनाचा सातवा दिवसही मोठया प्रतिसादाचा ठरला. अवघ्या सात दिवसांत या प्रदर्शनाने तब्बल नऊ  कोटी रुपयांच्या उलाढालीचा टप्पा ओलांडून एक नवा इतिहास रचला आहे.

नवी मुंबईकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ‘महालक्ष्मी सरस-२०२६’ प्रदर्शनाला मुदतवाढ देण्यात आली आहे. सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये सुरू असलेले हे प्रदर्शन आता ४ एप्रिलऐवजी ५ एप्रिलपर्यंत खुले राहणार असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली.

नवी मुंबईकरांचा हा अभूतपूर्व आणि उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून, तसेच सहभागी महिलांच्या आग्रही मागणीचा मान राखून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रदर्शनाचा कालावधी एका दिवसाने वाढवण्याची घोषणा केली आहे.

महाराष्ट्राच्या चांद्यापासून ते बांदयापर्यंतच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिला उद्योजिकांच्या कौशल्यपूर्ण उत्पादनाचा ४९० स्टॉल्सच्या माध्यमातून सुरू असलेली ही ‘स्टार्टअप क्रांती’ ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा एक उल्लेखनीय टप्पा ठरला आहे. अवघ्या सात दिवसांत सुमारे ९ कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल करत या प्रदर्शनाने नवा उच्चांक गाठला आहे. ग्रामीण भागातील महिलांनी सादर केलेल्या उत्पादनांना नवी मुंबईकरांनी दिलेला भरघोस प्रतिसाद यामागे महत्त्वाचा घटक ठरला आहे.

ग्रामीण भागातील हस्तकला, सेंद्रिय उत्पादने, पारंपरिक वस्तूंना,  खाद्यपदार्थ यांना ग्राहकांची मोठी पसंती मिळत असून,  मुंबईसारख्या बाजारपेठेत मिळालेली ही पसंती ग्रामीण  महिलांना प्रोत्साहन देणारी ठरत आहे.

प्रदर्शनातील खाद्य विभागात दररोज प्रचंड गर्दी होत असून सकाळपासून रात्रीपर्यंत खरेदीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. अनेक मान्यवर आणि सेलिब्रिटींनीही प्रदर्शनाला भेट देत सहभागी महिलांचे कौतुक केले. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा हा उपक्रम व्यापक पातळीवर यशस्वी ठरत आहे.

नागरिकांची वाढती मागणी आणि महिलांचा उत्साह लक्षात घेऊन प्रदर्शनाची मुदत वाढवण्यात आल्याचे गोरे यांनी सांगितले. वाढीव कालावधीत अधिकाधिक नागरिकांनी भेट देऊन ग्रामीण महिलांच्या कष्टांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन उमेद अभियानामार्फत करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow