राज्यात इंधनसाठा मुबलक; पेट्रोल, डिझेल व एलपीजी पुरवठा सुरळीत

 0
राज्यात इंधनसाठा मुबलक; पेट्रोल, डिझेल व एलपीजी पुरवठा सुरळीत

मुंबई, दि. 25 : राज्यातील  इंधनपुरवठ्याबाबत कोणतीही टंचाई नसून पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या — हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल), भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) आणि इंडियन ऑइल (आयओसीएल) – यांच्या माध्यमातून राज्यभर इंधनाचे वितरण नियमित आणि सुरळीतपणे सुरू असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.

राज्यातील इंधनसाठ्याची स्थिती समाधानकारक

तेल विपणन कंपन्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, २५ मार्च २०२६ रोजी राज्यातील इंधनसाठ्याची स्थिती समाधानकारक असून, पेट्रोलचा साठा 2,05,232 किलोलीटर, डिझेलचा साठा 4,67,603 किलोलीटर तर एलपीजीचा साठा 30,767 मेट्रिक टन इतका उपलब्ध आहे. हा साठा राज्याच्या गरजा पूर्ण करण्यास पुरेसा आहे.

तेल रिफायनरींकडून एलपीजीच्या दैनिक उत्पादनात वाढ

तेल रिफायनरींकडून एलपीजीच्या दैनिक उत्पादनात वाढ करण्यात आली असून सर्व उत्पादक कंपन्या पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. त्यामुळे तेल विपणन कंपन्यांना नियमितपणे पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा होत आहे आणि पुरवठा साखळीमध्ये कोणताही अडथळा निर्माण झालेला नाही.

इंधन वितरण यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत

राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा व नियमित साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही. इंधन वितरण यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत असून संबंधित विभागांकडून सातत्याने देखरेख ठेवली जात आहे. याशिवाय, खासगी क्षेत्रातील कंपन्यांकडे देखील पेट्रोलियम पदार्थांचा साठा उपलब्ध असल्याने एकूण पुरवठा अधिक सक्षम झाला आहे.

नागरिकांना आवाहन

नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवा, सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेश किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये. भीतीपोटी इंधनाचा साठा करण्याचा प्रयत्न करू नये किंवा एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पेट्रोल किंवा डिझेल खरेदी करू नये. पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळावी, ज्यामुळे वाहतूक कोंडी किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.

तसेच, इंधनपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन व संबंधित कंपन्यांकडून सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून यावर नागरिकांनी विश्वास ठेवावा. कोणतीही शंका किंवा माहिती जाणून घेण्यासाठी केवळ अधिकृत शासकीय माध्यमांवरच अवलंबून राहण्याचे आवाहन अन्न नागरी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

शासनाचे इंधन पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण

सद्यस्थितीत केंद्र व राज्य शासन इंधन पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण ठेवून परिस्थिती प्रभावीपणे हाताळत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता शांतता व संयम राखून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.

०००

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow