नवी मुंबईत ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनास उत्साहात सुरुवात

 0
नवी मुंबईत ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनास उत्साहात सुरुवात

मुंबई, दि. २४ : मुंबई आणि नवी मुंबईकरांसाठी आनंदाची पर्वणी घेऊन आलेल्या ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनाचे भव्य उद्घाटन वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये जल्लोषात झाले. महिला शक्तीच्या उत्साहात हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले झाले आहे. महालक्ष्मी सरस प्रदर्शन ३ एप्रिलपर्यंत सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत  सुरू राहणार आहे. वातानुकुलित असलेल्या या प्रदर्शनात विनामूल्य प्रवेश आहे.

उदघाटन सोहळ्याला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, नवी मुंबईच्या महापौर  सुजाता सुरज पाटील, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, मुख्य परिचालन अधिकारी निखिलकुमार ओसवाल, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सलूजा सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.

नवी मुंबईच्या महापौर  सुजाता सुरज पाटील म्हणाल्या की,  आज महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. मुंबई आणि नवी मुंबईकरांच्या दारी ही मोठी संधी चालून आली आहे. ग्रामीण भागातील बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी नवी मुंबई महापालिका सर्वतोपरी मदत करील असे सुजाता पाटील म्हणाल्या.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी महिलांच्या प्रगतीचा गौरव केला. महामंडळाच्या माध्यमातून महिलांना जास्तीत जास्त आर्थिक पाठबळ देण्यासाठी महामंडळ सक्षम आहे. सरसला मिळणारा प्रतिसाद उत्स्फूर्त असून उलाढाल सातत्याने वाढत आहे. राज्यातील सर्व महामंडळे एकत्र करून कर्ज वाटपाची संकल्पना आम्ही राबवण्याचा विचार करीत आहोत. ज्यामुळे महिलांचा सहभाग आणि उत्साह अधिक वाढेल,असे नरेंद्र पाटील म्हणाले.

उमेदचे सीईओ नीलेश सागर म्हणाले, ‘ महालक्ष्मी सरसने महिलांच्या पंखात बळ दिले आहे. आता आमचे उद्दिष्ट राज्यातील एक कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ करण्याचे आहे.  ‘४२०० हून अधिक उत्पादने आता ऑनलाइन व्यासपीठावर उपलब्ध असून आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्केटिंग आणि पॅकेजिंगमध्ये मोठी सुधारणा झाली आहे.  उमेदचे मुख्य परिचलन अधिकारी निखीलकुमार ओसवाल  यांनी आभार मानले.

वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित ‘महालक्ष्मी सरस’ हे प्रदर्शन  महिलांच्या जिद्दीचा उत्सव आहे. इथले प्रत्येक उत्पादन युनिक आहे.मग ते हाताने विणलेले कापड असो, घरगुती मसाले असोत की हस्तकलेच्या वस्तू.

महालक्ष्मी सरस प्रदर्शनात ४९० स्टॉल्स लावण्यात आले आहेत. यामध्ये उत्पादन वस्तूंचे स्टॉल्स: ४२० (स्टार्ट-अप क्रांती आणि बचत गटांची उत्पादने) तर खाद्यपदार्थ स्टॉल्स ७० आहेत. विविध राज्यातील अस्सल चवींची मेजवानी या ठिकाणी  मिळणार आहे. प्रदर्शनाला आर्वजून भेट द्यावी असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow